Ahmednagar Politics : तुम्ही मंजूर केलेल्या कामाचे नारळ तुम्ही फोडा, आम्ही येणारही नाहीत; परंतू मी मंजूर केलेल्या कामाचं नारळ मीच फोडणार. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नका, असा टोला आमदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला.
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक व नांदगाव येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात आ.लंके बोलत होते. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके,
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच सखाराम सरक, सेवा संस्थेचे चेअरमन नंदकुमार सोनवणे, सरपंच बाबा काळे यांच्यासह स्थानिक कार्यकतें, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी बोलताना आ. निलेश लंके म्हणाले, माझं जाहीर आव्हान आहे की, तुम्ही तुमच्या साडेचार वर्षातील कामाचा लेखाजोखा समोरासमोर कागदोपत्री घेऊन बसा, मी माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसतो.
काहीतरी बातम्या छापून आणायच्या, जिल्हा परिषदेच्या प्रशासकिय मंजुऱ्या घेऊन जायच्या आणि सांगायचे हे काम तुझ्या गावचं. जिल्हा परिषदेचा आणि तुमचा काय संबंध ? तरीही सांगायचे आम्ही काम केले असे सांगत आ. लंके यांनी विखे -पिता पुत्रांवर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
फुकटचेच नारळ आणि फुकटचेच काम
पारनेर तालुक्यात पालकमंत्र्यांनी सबस्टेशनचे उद्घाटन केले. महाविकास आघाडीच्या काळात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून हे सबस्टेशन मंजुर झाले आहे. तुम्ही सबस्टेशनचा नारळ कुठे फोडता ? त्यांना भानच राहिले नाही, फुकटचे नारळ गोळा करायचे,
फुकटच्या कामावर जायचे आणि गावातल्या कार्यकर्त्यांना सांगायचे बोर्ड लावा ! कार्यकर्त्यांनीही बोर्ड लावण्यापूर्वी शहानिशा करायची ना ! शिंगवे ते वांबोरी रस्त्याचे कामही मीच मंजुर केले. त्याचे पत्रही माझ्याकडे आहे. त्याचेही श्रेय विरोध घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा टोला आ. लंके यांनी लगावला.