Eknath Shinde : सध्या मराठा समाजाला आरक्षण हा विषय अनेक दिवसांपासून तसाच आहे. यामुळे मराठा समाज नाराज आहे. आता याबाबत विधानपरिषदेत आमदार भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी विधीज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत केला आहे.
यामध्ये हरिष साळवे, रोहतगी, पटवालिया, विजयसिंह थोरात, अक्षय शिंदे या ज्येष्ठ वकिलांचा समावेश आहे. मराठा समाज आरक्षणाचा न्यायालयीन लढा जिंकूच. त्यासाठी वकीलांची फौज यासोबतच आरक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांना सोबत घेऊन हा लढा पूर्णपणे ताकदीने लढू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या समीक्षेसाठी न्या. दिलीप भोसले यांची समिती नियुक्त केली. सध्या सरकार पुढची पावले टाकत आहे. पुनर्विचार याचिका दाखल करणे, निष्कर्षाला आव्हान आणि एसईबीसी सवलतीबाबत आयोग नियुक्त करणे तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाद मागणे सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यांना ओबीसीच्या सर्व सवलती, लाभ दिले जातील. यात ओबीसी बांधवांच्या सवलती, लाभांमध्ये कुठेही तडजोड केली जाणार नाही. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच ते म्हणाले, सर्वोच्च न्यायायालयाने आरक्षण रद्द करण्यापूर्वी निवड झालेल्या पण नियुक्ती न झालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांना अधिसंख्य म्हणून नियुक्ती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे देखील ते म्हणाले.