Eknath Shinde : सध्या पुण्यात पोट निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामुळे अनेक मोठे नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यात अनेक ठिकाणी सभा बैठका घेतल्या. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावेळी त्यांनी पुण्यातील शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी केली. या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच मध्यवर्ती कार्यालयात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, पुण्यातील आमचं कार्यालय बघायला आलो आहे. आमच्या नेत्यांनी इथं मला बोलावले आणि मी आलो. आमच्या लोकांनी मिळून भव्य कार्यालय त्यांनी पुण्यात उभं केलं आहे. तेच पहायला मी आलो आहे. यावेळी रात्रीचे दोन वाजले होते.
लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे रात्री 2 वाजता देखील एवढी गर्दी दिसत आहे. सगळे लोकं भेटायला आले आहेत. त्यांच्या प्रेमाचा मी काय ऋणी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी पुण्यात रोड शो देखील केला.
दरम्यान, कसबा आणि चिंचवडमध्ये सध्या पोट निवडणूक होत आहे. रविवारी याठिकाणी मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे बडे नेते अनेक मंत्री पुण्यात तळ ठोकून आहेत. यामुळे रंगत वाढली आहे.