Eknath Shinde : शिवसेनेची कोट्यवधींची मालमत्ता शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार, 186 कोटींची आहे मालमत्ता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Shinde :  पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार हे नक्की आहे. शिवसेना पक्षाचा फंड वापरण्याचीही परवानगी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. यामध्ये मोठी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आणि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यामुळे शिंदे गटाला ही रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ही लढाई पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. पक्षाचं चिन्ह आणि नाव महत्त्वाचं होतं. त्यासाठी लढाई होती. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही. अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे, असे शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

तसेच आम्ही त्या रस्त्याने गेल्यावर शिवसेना भवनाला नमनच करू. ज्यांना पैशाचा लोभ आहे. त्यांनी बघावं. आमचं ते काम नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. तोच आमचा अजेंडा आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना भवनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय घडामोडी घडतात, हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.