Ahmednagar Politics : विकासकामांना आडकाठी केली तरी हटणार नाही ! मी विकासकामे करणारच – आ. रोहित पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, सध्याच्या राज्य शासनाने विविध कामांवर स्थगिती लावल्याने विलंब होत होता. परंतु त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ती कामे सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत.

त्यापैकीच जवळपास ७ कोटींच्या कामांचे भूमिपूजन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत केले जात आहे. विरोधकांनी विकासकामांना कितीही आडकाठी निर्माण केली तरी मी हटणार नाही, विकासकामे करणारच असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजीमंत्री आ. विश्वजीत कदम व शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची विशेष उपस्थिती होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी संग्रहालय बांधकाम, जन्मस्थळी असलेल्या नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण करणे, त्याबरोबरच जन्मस्थळी दोन भव्य मोठ्या स्वागत कमानीचे बांधकाम अशा तब्बल ७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन चौंडी येथे पार पडले..

आमदार पवार यांनी यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी २ कोटी ३ लाख रुपये व सीना नदीवर पश्चिम घाटाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये अशी कोट्यावधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यानंतर आता आणखी ७ कोटींच्या विकासकामांचे भव्य दिव्य असे भूमिपूजन चौंडी येथे पार पडले.

कर्जत-जामखेडमधील नागरिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व युवा वर्गाने या भूमिपूजन सोहळ्याला व सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले होते.

त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यासोबतच चौंडी येथून युवा संघर्ष पदयात्रेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली असून ही संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे.