Maharashtra News : भाजपचे नेते अमित शाह यांच्या प्रमाणेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचा शब्द दिला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला.
त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरेंचा आरोप बिनबुडाचा असून, ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना स्मृतिभ्रंश झाल्याचा खोचक टोला लगावत, त्यांनी केवळ परिवाराचा विचार केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, यामुळे आता पुन्हा एकदा २०१९ मधील मुख्यमंत्री पदाच्या चर्चावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीत दावा केला की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिले होते.
त्यानुसार, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येकी २.५ वर्षे शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल, असा प्रस्ताव ठेवला. अमित शाह यांच्या समवेत त्या वेळी सहमती झाली.
दरम्यान, फडणवीस यांनीही आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून मी स्वतः दिल्लीला जाणार असल्याचा शब्द दिला. मात्र, फडणवीस यांनी तो शब्द पाळला नाही. उलट मलाच शिवसैनिकांसमोर खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांना स्मृतिभ्रंश – फडणवीस
उद्धव ठाकरे यांना स्मृतिभ्रंश झाल्याचा टोला लगावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. मुख्यमंत्री पदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. आदित्य यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांना मुख्यमंत्री काय मंत्रीपद देण्याचाही विचार केला नव्हता, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले असून, त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याचा हल्ला चढवत ते पुढे म्हणाले, एकीकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणतात, दुसरीकडे आदित्यला मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगतात. यातून त्यांनी केवळ परिवाराचा विचार केला. त्यामुळेच शिवसेना फुटली.
खोट बोल पण रेटून बोल – मुख्यमंत्री
खोट बोल पण रेटून बोल, ही उद्धव ठाकरे यांची संस्कृती आहे. खोट बोलण्याची एक परिसीमा असते. मात्र, ठाकरेंना युतीत स्वतःला मुख्यमंत्री होता आले नसते. त्यामुळे ते आता खोटे आरोप करत आहेत.
वास्तविक अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुठलीही अशा पद्धतीची चर्चा झाली नव्हती. शाह यांनी मुख्यमंत्री पद देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता; परंतु ठाकरे हे सातत्याने खोटे बोलत आहेत,
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांचा खरपूस समाचार घेतला.