राजकारण

Ahmednagar Politics : शेतकऱ्यांची वज्रमुठ ! अखेर ते सभासद कारखान्याचा ताबा घेणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचा निकाल नुकताच सभासदांच्या बाजूने लागला आहे. लवकरच शेतकरी सभासद कारखान्याचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी कारखाना बचाव समितीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

तालुक्यातील उत्तरेकडील बागायती पट्टा असलेला मांडवे खुर्द परिसर येथे कारखाना बचाव व पुर्नजीवन समितीच्या कार्यकत्यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मांडवे, देसवडे, तास, वनकुटे परिसरातून शेतकरी व सभासद हजर होते. कारखाना भ्रष्ट मार्गाचा वापर करून पुणे येथील खाजगी कंपनीने कसा बळकावला याबाबत माहिती यावेळी सभासदांना दिली.

कारखाना विक्री मागे कोणाचा हात होता, तो का विकण्यात आला व त्यामुळे पारनेरकरांवर कसा अन्याय करण्यात आला. याची माहिती बचाव समितीचे रामदास घावटे यांनी दिली. कारखाना विषयीचे विविध खटले सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असून ते निकालाच्या अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.

पारनेर साखर कारखान्याचे आता पुर्नजीवन होत असुन कारखान्याच्या सुमारे वीस हजार सभासदांचे सभासदत्व आता जिवंत होणार असल्याचे बबनराव सालके म्हणाले. कारखान्याच्या अंतिम टप्प्यातील लढाईत आमचा मांडवे खुर्द परिसर सदैव बचाव समितीच्या पाठीशी राहून साथ देईल असे आश्वासन येथील ऊस बागायतदार जगदीश गागरे यांनी दिले.

पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत समितीचा विजय झालेला आहे. आता या पुढील लढाईत बचाव समितीला पूर्ण साथ द्यावी असे आवाहन शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांनी यावेळी केले. निकालानंतर आता ताबा घेतला जाईल, त्यावेळी कुणी हरकत अडथळा निर्माण केला, तर जशाच तसे उत्तर देऊ, अशी संतप्त भावना मांडवेतील जेष्ठ सभासदांनी व्यक्त केली.

Ahmednagarlive24 Office