कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी व यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व पुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी भेट घेतली. त्याआधी देखील खा. सुजय विखे यांनी अमित शहा यांची याविषयावर भेट भेटली होती.
या भेटी कांद्याच्या प्रश्नावर असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु असे असले तरी नागरिकांत मात्र दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटविषयी ही चर्चा होती असे म्हटले जात आहे. ही भेट म्हणजे आगामी लोकसभेसाठी मोर्चेबांधणी होती अशी चर्चा आहे.
कांदा उत्पादकांना दिलासा, सोबतच लोकसभेचे तिकीटही मिळणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे दुसऱ्यांदा इच्छुक आहेत. लोकसभेच्या निमित्त महिन्याभरापूर्वी डॉ. विखे यांनी मतदारसंघात चाचणीनिमित्त साखर डाळ वाटप करून पेरणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी खासदार डॉ. विखे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
गुरुवारी दुसऱ्यांदा खासदार विखे हे पिता तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत शहा यांना भेटले. कांद्याच्या निर्यात बंदीचे निमित्त असले तरी ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, कांद्याच्या निर्यात बंदी बाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेईल, असे आश्वासन शहा यांनी विखे पिता पुत्रांना दिले आहे.