Politics News : देशातील आणि परदेशातील काही मोठ्या, सामर्थ्यशाली लोकांनी मला सत्तेतून हटवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. परंतु नारीशक्तीचे आशीर्वाद आणि सुरक्षा कवचामुळे मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सज्ज ज्ज असून पहिला टप्पा एनडीएने जिंकलादेखील आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर येथे शनिवारी प्रचारसभेत बोलताना मोदींनी प्रामुख्याने महिला वर्गावर जोर दिला. माझ्या माता-भगिनी या सभेला मोठ्या संख्येने आल्या आहेत. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तुम्ही करत असलेला संघर्ष आणि दैनंदिन जीवनातील आव्हाने मी माझ्या घरी पाहिली आहेत.
त्यामुळेच गत दहा वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या सरकारने महिलांच्या सशक्तीकरणाला प्राधान्य दिले. परंतु सध्या देशातील आणि परदेशातील काही मोठे व सामर्थ्यशाली लोक मला सत्तेतून हटवण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र ते यशस्वी होऊ शकणार नाहीत.
कारण माझ्यामागे नारीशक्ती आणि मातृशक्तीचे आशीर्वाद आणि सुरक्षा कवच आहे. या शक्तींच्या मदतीने मी प्रत्येक आव्हानांचा सामना करत पुढे वाटचाल करत आहे, असे मोदी म्हणाले. देशातील माता, भगिनी, मुलींची सेवा करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यात आपले प्राधान्य असल्याचे सांगत मोदींनी महिलांसाठीच्या विविध योजनांचा उल्लेख केला.
शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात जनतेने विकसित भारतासाठी एनडीएच्या बाजूने मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांच्याकडे कोणताही नेता नाही,
भविष्यासाठी कोणताही दृष्टिकोन नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली. या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित जेडीएसचे संस्थापक व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची स्तुती केली.
वयाच्या नव्वदाव्या वर्षी देखील देवेगौडा यांची उर्जा आणि कटिबद्धता कौतुकास्पद असून माझ्यासाठी देखील ते प्रेरणास्थान आहेत, असे मोदी म्हणाले. कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
१४ जागांसाठी २६ एप्रिलला तर ७ मे रोजी उर्वरित १४ जागांवर मतदान होईल.