अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची आतषबाजी रंग उधळणार, अशी चिन्हे आहेत. उमेदवारीबाबत अस्पष्टता असताना भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी विधान परिषदेतील मतदारांना दिवाळीची मिठाई भेट पाठवल्याने त्यांचे राजकीय मनसुबे स्पष्ट झाले आहेत.
अन्य इच्छुक अद्याप पक्षश्रेष्ठींकडे नजरा लावून बसलेले असताना कर्डिलेंनी विधान परिषदेची अप्रत्यक्ष तयारीच सुरू केल्याने यंदाचा विधान परिषदेचा सामना ‘तोलामोला’चा ठरणार असल्याची चर्चा आहे.
दिवाळी संपताच ऐन थंडीत विधान परिषदेचे राजकारण तापणार आहे. विधान परिषद सदस्य होण्याची कामना अनेकांनी मनी धरली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली.
राज्यात सत्तेचे समिकरणही बदलले सध्या नगर विधान परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीचे आ.अरूणकाका जगताप करतात. पक्षाकडून यावेळी उमेदवार बदलाच्या चर्चा आहे.
मात्र पक्षातून अद्यापही कोणी उमेदवारीसाठी स्पष्टपणे दावा ठोकलेला नाही. दुसरीकडे भाजपातून शिवाजी कर्डिले यांनी डाव टाकण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांनी शनिवारी विधान परिषद निवडणुकीतील मतदारांसह महत्त्वाच्या नेत्यांना दिवाळी मिठाईचे बॉक्स पाठवल्याची चर्चा वेगाने राजकीय वर्तुळात पसरली.
5 तारखेला प्रत्यक्ष भेटीने नियोजनही त्यांनी फराळ कार्यक्रमाच्या निमित्ताने केले आहे. यावरून त्यांनी उमेदवारी करण्याचे निश्चित केल्याचे मानले जात आहे.
सध्यातरी त्यांचे नाव भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात असले तरी ऐनवेळी वेगळा डावही मांडला जावू शकतो, अशी चर्चा आहे.