Gautam Adani : उत्तर प्रदेशच्या मध्यांचल विद्युत वितरण महामंडळाने अदानी समुहाचे टेंडर रद्द केले आहे. यामुळे अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. या कामासाठी अदानी समुहाने सर्वात कमी रकमेची निविदा सादर केली होती. मात्र सध्या अदानी यांच्यावर मोठे संकटे येत आहेत.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच श्रीमंतांच्या यादीतून त्यांचे नाव देखील खूपच खाली आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अदानी समुह, जीएमआर आणि इनटेली स्मार्ट कंपनीचे ५ हजार ४५४ कोटी रुपयांचे काम रद्द केले आहे.
या अंतर्गत संपूर्ण राज्यात २.५ कोटी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार होते. दरम्यान, या निविदेचा सुरुवातीपासूनच विरोध होत होता. स्मार्ट मीटरची मंडळाची अंदाजित किंमत ६ हजार रुपये होती.
असे असताना मात्र, अदानींच्या निविदेत मीटरची किंमत ९ ते १० हजार रुपये सांगण्यात आली होती. त्यामुळेच महाग मीटर लावण्याचाही मुद्दा उपस्थित झाला होता. याबाबत आयोगात याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, सर्व घडामोडीनंतर अभियंता अशोक कुमार यांनी तांत्रिक कारणाने अदानी समुहाचे टेंडर रद्द केल्याचे म्हटले. मंडळाच्या या निर्णयाचे ग्राहक परिषदेनेही समर्थन केले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.