Maharashtra Politics : आगामी निवडणुका रासप सर्व जागा स्वबळावर लढविणार असून, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकत्यांना आम्ही संधी देणार आहोत. आजपर्यंत जनतेने सर्व प्रस्थापित पक्षांना व घराणेशाहितील उमेदवारांना निवडून दिले असून, आता एकदा रासपला संधी द्यावी, असे आवाहन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले.
मिशन २०२४ अंतर्गत जनस्वराज्य यात्रेची कर्जत येथे सांगता झाली, या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रास्ताविक प्रा. अमोल क्षीरसागर यांनी केले. प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी बोलताना कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून एसटी डेपोचा प्रश्न प्रलंबित असून तालुक्याला एमआयडीसी प्रत्यक्षात उभी राहावी, अशी मागणी केली.
रासपची स्थापना चोंडी येथे झालेली असून युवकांनी झोकून देऊन काम केल्यास नक्कीच चांगले दिवस येतील, असे म्हटले. या वेळी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी कर्जत शहराच्या स्ट्रीट लाईटसाठी स्वतःच्या निधीतून दहा लाख रुपये जाहीर केले तर एसटी डेपो व एमआयडीसीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वेळा घेऊन स्वतंत्र बैठक लावण्याचा शब्द दिला.
एक ते दीड महिन्यात हे प्रश्न मार्गी न लागल्यास आपण स्वतः कर्जत मध्ये आंदोलन करू, असा इशारा दिला. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आपण भाजप बरोबर आलो मात्र, मुंडे याच्या जाण्याने मी पोरका झालो असून, आगामी काळात भाजपला त्यांची जागा दाखवून देत या पक्षाला पोरके करणार आहोत.
आगामी काळात माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा घाट घातला जात असला तरी ते आपण होऊ देणार नाही. आगामी निवडणुकीत स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर करताना भाजपाबरोबर जाणे ही सर्वात मोठी चूक होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असे सांगत भाजपावर टीका केली. राजकारणात घराणेशाही मोठ्या प्रमाणात असून, सामान्य माणसांनी आता राजकारणात येण्याचे आवाहन केले