सोसायट्यांचे गट सचिव पुन्हा जिल्हा देखरेख संस्थेच्या अधिपत्याखाली : आ. शिवाजी कर्डिले

Published on -

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाने २३ एप्रिल २०२५ रोजीच्या राजपत्राव्दारे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये कलम ६९ अ खालील (४) अन्वये राज्यातील जिल्हा देखरेख संस्थांना पुर्नजीवित करण्याचे अध्यादेश महामहीम राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्याचे मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी जारी केला आहे.

या अध्यादेशामुळे जिल्हा देखरेख सहकारी संस्था म्हणजेच केडर संस्था पुन्हा अस्तित्वात आली असल्याने वि. का. सेवा सोसायटयांचे गट सचिव पुन्हा अहमदनगर जिल्हा देखरेख संस्थेच्या अधिपत्याखाली आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हा देखरेख सहकारी संस्था (केडर) पुर्नजीवित जिल्हा सहकारी बँक, करण्याबाबतचा ठराव करुन शासनाकडे यासंदर्भात मागणी केलेली होती. या मागणीचा आम्ही सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचेच हे यश आले असून राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून सहकार क्षेत्रातील मोठा प्रश्न सोडवला असल्याने यामुळे जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व सोसायटींचे सचिव यांच्या नियंत्रणासंदर्भात निर्माण झालेला प्रश्न १५ वर्षानंतर मार्गी लागल्याची माहीती आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

सहकारी कृषी पतसंरचना व्यवस्थित होण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये बदल करुन त्यातील कलम ६९ क रद्द करुन ६९ ख अस्तित्वात आल्याने जिल्हा व तालुका देखरेख संस्थांचे कामकाज संपुष्टात येवून सन २००० मध्ये जिल्हा स्तरिय समितीची रचना करण्यात आली होती. या रचनेमुळे महाराष्ट्रातील इतर जिल्हयाबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील वि.का. सेवा सहकारी सोसायटयांचे सचिव यांचे संपूर्ण नियंत्रण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे गेले होते.

आता या नविन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ६९ अ सहकार कायद्याने गट सचिवांची नियुक्ती व यांचे वेतन, निवृत्ती वेतन त्यांच्यावरील प्रशासकीय कार्यवाही यांचे एकूणच आस्थापना म्हणून अहमदनगर जिल्हा देखरेख संस्थांकडे कामकाज आले असून जिल्हा देखरेख संघाला नविन सचिव शासनाने दिलेल्या कार्यपध्दती व सेवेच्या शर्ती वर भरण्याची ही मुभा दिली असल्याचीही माहिती चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. अहमदनगर जिल्हा बँकेने सतत पाठपुरावा केल्याने हे यश प्राप्त झाले आहे. यामुळे जिल्हयातील वि.का. सेवा संस्थांचे कामकाज निश्चीतच सुधारेल असे मत माजीमंत्री आमदार कर्डिले यांनी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News