Gunaratna Sadavarte : सतत चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. याबाबत सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. यामुळे आता बार कौन्सिलने त्यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
बार कौन्सिलने पुढील २ वर्षांसाठी सदावर्तेंची वकिली सनद रद्द करण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे सदावर्तेंना आता पुढची २ वर्ष वकिली करता येणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी त्या ड्रेसमध्ये विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती. अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हणत सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मंचरकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती.
आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. आता बार कौन्सिलच्या निर्देशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधीही बार कौन्सिलच्या निर्णयाविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, वकिसांसाठी एक आचारसंहिता असते. तिचं उल्लंघन करु नये, अशी अट सनद देताना बार कौन्सिल घालत असते.
असे असताना मात्र या अटींचे उल्लंघन केल्याने बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर २ वर्षांसाठी सनद रद्द करण्याची कारवाई केली आहे. शिस्तभंगाची कारवाई केली आहे, अशी माहिती बार कौन्सिलच्या वतीने देण्यात आली आहे.