Ahmednagar News : ते जनतेचा विचार न करता स्वहितासाठी गेले, त्यांना जाऊ द्या. जे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलं, तेच २०२४ च्या निवडणुकीत दाखवून द्या, असे मत कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, आमदार रोहीत पवार, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश पेदाम, विक्रमगडचे आमदार सुनिल भुसारे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मधुभाऊ नवले, जालिंदर वाकचौरे, शिवाजी धुमाळ, सतिश भांगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार रोहीत पवार म्हणाले, भांगरे आणि पवार कुटुंबाचे संबंध हे पूर्वीपासुन टिकून आहे.
ते कायम राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. स्व. अशोक भांगरे यांच्यासारख्या खंबीर माणसाची आज खऱ्या अर्थाने अकोले तालुक्याला गरज होती. असे सांगत अप्रत्यक्षपणे माजी व आजी आमदारांवर निशाणा साधला.
आज जे स्वहितासाठी गेले, त्यांना जाऊ द्या, त्यांनी जनतेचा विचार न करता स्वत:चा विचार केला. २०१९च्या निवडणुकीत जनतेने त्यांना दाखवुन दिले. आता २०२४च्या निवडणुकीत त्यांना दाखवुन द्या, असे ते म्हणाले.
आमदार थोरात म्हणाले की, भांगरे परिवाराला राजकारण आणि समाजकारणाची मोठी परंपरा आहे. कायम समाजात राहणारे कुटुंब अशी त्यांची ओळख असून स्व. भांगरे यांनी अनेक सामाजिक व राजकीय चळवळीत काम केले. त्यांच्या जाण्याने तालुक्यात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.