Sujay Vikhe Patil On Jayant Patil : सध्या लोकसभा निवडणुकांचे सर्वांनाच वेध लागले आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी तर आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी देखील सुरू केली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट देखील पडली आहे. तर काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेत दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश घेतला आहे.
यामुळे आगामी लोकसभा विशेष रंगतदार होणार आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी मधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले होते. त्यांनी दिल्लीतील सत्ताधारी यांना चितपट करण्यासाठी शरद पवार यांनी शेवटचा डाव राखून ठेवला आहे, असे म्हटले होते.
दरम्यान, खासदार सुजय विखे यांनी या दाव्याची खिल्ली उडवली आहे. खासदार सुजय विखे यांनी जयंत पाटील हे तिकडे किती दिवस राहतील हे अगोदर पाहावे लागेल. नाहीतर शेवटचा ते डाव आखतील.
असा टोला लगावला आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अहमदनगर सहित संपूर्ण राज्यात डॉक्टर सुजय विखे यांच्या या वक्तव्यानंतर शरदचंद्रजी पवार यांच्या गटातील जयंत पाटील हे सुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत की काय?
अशा चर्चा आता पाहायला मिळत आहेत. खरेतर गेल्या काही महिन्यांच्या घडामोडी पाहिल्या असता राज्यातील काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये गृहप्रवेश केला आहे.
अशा परिस्थितीत, जयंत पाटील सारखा बडा नेता तर आता भाजपाच्या गळाला लागला नाही ना ? अशा चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
विशेष म्हणजे या चर्चा आताच सुरू झाल्यात असे नाही तर याआधी देखील जयंत पाटील हे भाजपाच्या वाटेवर निघाले आहेत अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या होत्या.
तथापि या चर्चांमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून मागेच स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र आता सुजय विखे पाटील यांनी जयंत पाटील हे तिकडे किती दिवस राहतील हे पहावे लागेल असे म्हटले असल्याने या चर्चांना पुन्हा एकदा खतपाणी मिळाले आहे.