राजकारण

नागरिकांची सोय न बघता अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव झालाच कसा ? स्वतंत्र तहसील निर्मिती हे राजकीय षडयंत्र…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव तयार झाला, तो थेट मंत्रालयापर्यंत सुद्धा पोहोचला. संगमनेरची मोडतोड होत असताना लोकप्रतिनिधी गप्प का बसले? आता ते माहीत नसल्याचा आव आणत आहेत. ते संगमनेरच्या जनतेसोबत आहेत की आजवर संगमनेरला विरोध करणाऱ्यांच्या सोबत हे त्यांनी स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असा संतप्त सवाल ज्येष्ठ कार्यकर्ते आर.बी. राहणे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला.

स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीच्या संदर्भात भूमिका घेण्यासाठी तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी आज शेतकी सहकारी संघ येथे बैठक आयोजित केली होती त्यावेळी आर.बी. रहाणे बोलत होते. शेती संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे,सरपंच भाऊराव रहाणे ,विजय राहणे , लक्ष्मणराव कुटे, रमेश गुंजाळ,शांताराम कढणे, नानासाहेब कढणे ,नाना राहणे, कैलास सरोदे बालम सरोदे ,सौ उज्वला राहणे, सुरेश थोरात, सौ अर्चनाताई बलोडे, सौ पद्मताई थोरात रवी सरोदे आदींसह गावातील नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आर.बी राहणे म्हणाले की संगमनेरची मोडतोड करून येथील घडी बिघडवण्यासाठी ज्या राजकीय शक्ती काम करत आहेत. त्यांनी अवघ्या चार ते पाच दिवसात स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पोहोचवला सुद्धा. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या परवानगीशिवाय हे होऊच शकत नाही, संगमनेर शहराच्या जवळपासची गावे संगमनेर पासून तुटत असताना लोकप्रतिनिधी गप्प का होते? संगमनेर मधील जनतेने उद्रेक करण्याची भूमिका घेतल्यानंतर ते आता सारवासारव करत आहेत.

अजूनही संगमनेरच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे त्यांनी केलेले पाप ते मान्य करायला तयार नाही, प्रस्ताव थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आणि ते म्हणतात की असा प्रस्तावच तयार झाला नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते खोटी माहिती पसरवत आहेत. मात्र प्रत्यक्षात स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव 24 तारखेलाच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला 27 तारखेला तो आयुक्तालयात गेला, काही दिवसात त्यावर निर्णय होऊ शकतो असे असतानाही लोकप्रतिनिधी संगमनेर मधील जनतेसोबत का खोटे बोलत आहेत? असाही सवाल राहणे यांनी केला.

संगमनेरच्या जनतेला विश्वासात न घेता जर कोणी संगमनेर सोबत खेळत असेल, संगमनेरची मोडतोड करत असेल तर संगमनेरातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. संगमनेर तालुका खिळखिळा करण्याचा हा डाव आहे. प्रशासनाने नेमका कोणता हेतू ठेवून स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव तयार केला, संगमनेरला लागून असलेल्या गावांनी तब्बल 25 किलोमीटर आश्वीला प्रशासकीय कामकाजासाठी जाणे यामध्ये जनतेची सोय आली कुठून? याउलट असा प्रस्ताव तयार करण्या पाठीमागे एक मोठे राजकीय षडयंत्र आहे. संगमनेरचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा हा डाव आहे, असाही आरोप राहणे यांनी केला.

जनतेचा अंत पाहू नका

विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी संगमनेरच्या हिताची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असे असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून ते संगमनेरची मोडतोड करणार असतील तर संगमनेर मधील जनता हे सहन करणार नाही. संगमनेर ही क्रांतीची भूमी आहे हे कोणीही विसरता कामा नये, संगमनेरच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये.
आर. बी. राहणे

बाळासाहेब थोरात यांचे शब्द खरे ठरले

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कायम पालकत्वाच्या भूमिकेतून संगमनेरला सांभाळले, एका दुष्काळी तालुक्याचे रूपांतर विकसित तालुक्यात केले. जेव्हा जेव्हा संगमनेरच्या हक्काचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तेव्हा ते मैदानात उतरले. निवडणुकीच्या काळात बाळासाहेब थोरात सांगत होते की विरोधकांचा हेतू संगमनेरची मोडतोड करणे हा आहे, संगमनेरचा विकास त्यांना बघवत नाही, दुर्दैवाने आज त्यांचे शब्द खरे ठरत आहेत. अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत घात आहे.-संपतराव डोंगरे

प्रस्ताव सोशल मीडियावर

विद्यमान आमदार  यांनी जेव्हा असा प्रस्ताव झालाच नाही, काँग्रेसचे कार्यकर्ते खोटे बोलत आहेत आणि संभ्रम पसरवत आहेत, असे सांगितले त्यानंतर थेट जावक नंबर आणि तहसीलदारांच्या सईसकटचाच प्रस्ताव सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे संगमनेर मध्ये संतापाची लाट उसळली.

अहमदनगर लाईव्ह 24