Maharashtra News : शरद पवार हे आमचे दैवत आहे, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर त्यांनी पक्षातील नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे.
मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला यापूर्वीच संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंदूर येथील सभेत व्यक्त केले.
केंदूर (ता. शिरूर) येथील चौकात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मेघना बोडींकर-साकोरे, पुणे जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा केशर पवार,
तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सन २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी असताना पवार साहेबांनी नाकारली.
सोनिया गांधींचा परदेशीचा मुद्दा पुढे करीत साहेबांनी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेत पुढे सन २०१९ मध्ये भाजपसोबत जायचे ठरवले आणि माघार घेतली. या धरसोडीमध्ये मी शेवटी भाजपसोबत जाऊन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि ७२ तास उपमुख्यमंत्री झाल्याचे सांगितले.
राजकीय निर्णयांमध्ये साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता. मी त्यांचा मुलगा असतो तर असे निर्णय त्यांनी घेतले असते का? असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले, या सर्व घडामोडींना वैतागूनच अखेर मी निर्णय घेतला आणि आज तुमच्यापुढे उभा आहे. काही जण येथील वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण तसे काही होऊ देऊ नका, असेही पवार यांनी सांगितले.