बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं; राऊतांची शिंदे गटावर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटो शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचे सांगत आहेत याचे आश्चर्य वाटते. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिले असते, असे म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बाळासाहेब आमच्या सर्वांचे गुरु होते. ज्यांची शिवसेनेवर, महाराष्ट्रावर, देशावर अढळ निष्ठा आहे त्या सर्वांसाठी बाळासाहेब गुरु होते. त्यांनी आम्हाला दिशा दिली, मार्गदर्शन केलं. गुरु मोकळ्या हाताने देत असतो, तसंच बाळासाहेबांनी मोकळ्या हाताने, मनाने उधळण केली. असा गुरु होणे नाही. ते एका अर्थाने महाराष्ट्राचे आणि देशाचेही गुरु होते. प्रत्येक दिवशी आमच्या गुरुचं स्मरण होत असतं. आजच्या दिवशी विशेष होत आहे, कारण काही लोक शिवसेनेच्या बाहेर जाऊन बाळासाहेब गुरु आहेत सांगत आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनी त्यावर काय भाष्य केलं असतं हे समजून घेणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.