राजकारण

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘वंचित’च्या खेळीने राजकीय गणिते बदलली ! महाविकास आघाडी टेन्शनमध्ये, महायुतीही चिंतेत, पहा कुणाला बसणार फटका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण सध्या युती व आघाडीच्याच अवतीभोवती फिरत होते. विजयी कोण होणार? महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार?

याच चर्चा व्हायचा. परंतु आता ‘वंचित’ च्या एन्ट्रीने महाविकास आघाडी टेन्शनमध्ये, तर महायुतीही चिंतेत आली असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिर्डीत मोठ्या घडामोडी

तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या रूपवते कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील युवा नेतृत्व असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिडीत तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

उत्कर्षा महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे की महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे कोणाची डोकेदुखी वाढणार हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल. ‘वचित’ कडून आपणाला निश्चित उमेदवारी मिळणार असल्याचा दावा उत्कर्षा यांनी मीडियाशी बोलताना केला.

उत्कर्षा या दादासाहेब रूपवते यांची नात व स्वर्गीय प्रेमानंद रूपवते यांच्या कन्या आहेत. रूपवते परिवार काँग्रेस निष्ठावान समजला जातो. यंदा शिर्डी मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी त्यांची तयारी होती. पण मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटाला ही जागा मिळाल्याने त्या नाराज होत्या. उमेदवारीसाठी उत्कर्षा यांनी आ. बाळासाहेब थोरात,

पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह राहुल गांधींकडे फिल्डींग लावली होती. पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात होत्या. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून शिर्डीच्या उमेदवारीबाबात त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उत्कर्षा रूपवते यांनी दोन दिवसापूर्वीच वंचितमध्ये अधिकृत प्रवेश केला.

दिग्गजांच्या पोटात उठणार गोळा

मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी ४ लाख ८६ हजार ८२० मते घेतली होती. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे होते. त्यांना ३ लाख ६६ हजार ६२५ मते होती. वंचित आघाडीकडून संजय सुखदान यांनी ६३ हजार २८७ मते घेतली होती.

विशेष म्हणजे, मविआचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ‘वंचित’ च्या उमेदवारापेक्षा कमी मते होती. त्यांना फक्त ३५५२६ मते मिळवता आली. यावेळी रूपवते यांच्या रुपाने ‘वंचित’ला तगडा उमेदवार मिळाल्याने दिग्गजांच्या पोटात गोळा उठणार आहे.

अहमदनगरमधेही गणिते बदलणार

अहमदनगर लोकसभेतही महाविकास आघाडीकडून निलेश लंके, भाजपकडून खा. सुजय विखे उभे आहेत. परंतु येथेही वंचित आपला उमेदवार उभा करणात आहे. त्यामुळे अहमदनगर मध्येही याचा फटका नेमका लंके यांना की विखे यांना बसणार याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office