राजकारण

कोल्हे-पवारांच्या भेटीत पक्षबदलाचं ठरलं, पण.. तुतारी नव्हे मशाल? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : भाजपचे युवा नेते, नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी काल (दि.२७ ऑगस्ट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

शरद पवार हे कोल्हे यांच्या माध्यमातून महायुतीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या भेटीने विवेक कोल्हे पक्ष बदलतील हे जरी निश्चित मानले जात असले तरी ते ‘तुतारी’ हाती घेणार की मशाल हे पाहणे गरजेचे ठरेल.

आधी काय घडलंय ते पाहुयात
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक मांजरी येथे झाली. या बैठकीदरम्यान कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली.

भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे विवेक हे चिरंजीव, तर माजी मंत्री (स्व.) शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. या बैठकीनंतर या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गाडीत बसल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकत आहेत. शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना आपल्या गाडीत बसवून पुण्यात फिरले आणि राजकारणाचे चक्र कोपरगावसह राज्यात फिरू लागले.

तुतारी की मशाल?
विवेक कोल्हे यांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आता पक्ष निश्चित करणे गरजेचे झालेय. कोल्हे भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत यावे, अशी काहींची इच्छा आहे.

तर कोल्हे परिवार भाजपमध्येच रहावा, अशीही काहींची इच्छा आहे. भाजप सोडून कुठला पक्ष निवडायचा हे ठरवताना ते नक्कीच ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा सल्ला आणि मतदारसंघातील राजकीय समिकरणांचा विचार घेतील हे नक्कीच.

विवेक कोल्हे हे सध्या शरद पवार यांच्या गुडबूकमध्ये आहेत. त्यामुळे विधानसभेत तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाने कोल्हे यांच्या समोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अर्थात हाती मशाल घेण्याचा पर्याय देखील आहे.

आ. शंकरराव गडाख या पक्षाचे सहयोगी सदस्य असून सहकारातील मातब्बर नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे कोल्हेंच्या हिशोबाने हा पर्याय सोयीस्कर ठरू शकतो.

परंतु काही झाले, हाती तुतारी घ्यायची की मशाल हे ठरवण्याआधी ते शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्या सोबत चर्चा करतीलच शिवाय मतदारसंघातील राजकीय समिकरणांचा विचार देखील करतील यात शंका नाही.

Ahmednagarlive24 Office