महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या अनुशंघाने सर्वच पक्ष फिल्डिंग लावत आहेत. आपली ताकद वाढवत आहेत.
आता काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीत आता अॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी सामील झाली आहे. यामुळे आता नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत. मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्यातील जागांबाबत सविस्तर चर्चा झाली.
‘शिर्डी’च्या जागेचा तिढा वाढला
नगरची जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढविणार की शरद पवारांची राष्ट्रवादी हे स्पष्ट नसताना शिर्डी मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडीची मंगळवारी झालेली बैठक अनेक घडामोडींची ठरली.
ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित बहुजनचा महाविकास आघाडीत समावेश करत असल्याचे एकमताने जाहीर केले. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, विनायक राऊत तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख उपस्थित होते. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर बैठकीत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या या बैठकीत राज्यातील जागांसाठी चर्चा झाली. राज्यातील काही जागांवरून अद्याप तिढा आहे.
काँग्रेस राज्यातील २१ ते २३ जागांची मागणी करत आहे. काही जागांसाठी पक्ष विशेष आग्रही आहे. नगर दक्षिणेचा विषयही ऐरणीवर आला आहे. ही जागा दिल्यास लढण्याची तयारी सेनेने दाखवली आहे. मात्र जागा सोडायची की नाही, याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अद्याप विचारमंथन सुरू आहे.
राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडी आशावादी असल्याचे म्हटले जात आहे. ही जागा २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकली होती.
मात्र विद्यमान खासदार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याने उद्धव ठाकरे गट उमेदवाराच्या शोधात आहे. काही नावे चर्चेत आहेत. मात्र आता महाविकास आघाडीकडून काँग्रेस या शिर्डीवर दावा ठोकत असल्याने जागा कोणाला सुटणार याकडे मतदारसंघाचे लक्ष आहे.
वंचितचे काय?
महाविकास आघाडी मध्ये आता वंचित बहुजन आघाडी सामील झाल्याने राजकीय गणिते नक्की बदलतील. सध्या अहमदनगर मध्ये जागा वाटपात कोणती जागा कोणाकडे याचे चित्र महाविकास आघाडीबाबत जवळपास स्पष्ट होत आले होते.
त्यात आता वंचित चा समावेश झाल्याने गणिते प्लस मध्ये जातील की मायनस मध्ये हे पाहावे लागेल. तसेच वंचित ला नगरमध्ये काय देणार? हा देखील महत्वाचा प्रश्न असून आगामी काळात याचेही उत्तर मिळेल.