Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याऐवजी निळवंडे धरण काठोकाठ भरलेले आहे त्याचे उजवे व डावे कालवे अपूर्ण आहेत. या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे धरण रिकामे असणे गरजेचे आहे.
त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडावे व धरणाचे काम मार्गी लावावे. निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यास उत्तरेतील पुढारी राजकीय भावनेतून विरोध करतील. परंतु त्यांनीही हा विरोध करू नये.
नेवासे तालुक्याच्या मुळ धरणाच्या हक्काच्या पाण्यासाठी त्याग करायची वेळ आली तरी मागे पुढे हटणार नाही, असा निर्धार आमदार शंकरराव गडाख यांनी केला.
मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडण्याविरोधात नेवासा तालुक्यातील आक्रमक झालेल्या शेतकरी बांधवांनी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव गुरुवारी शेतकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अशोक येळवंडे, बाळासाहेब सोनवणे, योगेश होंडे, डॉ. अशोक ढगे, आण्णासाहेब पटारे, मच्छिंद्र म्हस्के, संजय नागोडे, अशोक गायकवाड आदींनी मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडण्याच्या निर्णयाचा विरोध केला.
आमदार गडाख म्हणाले, मुळा धरण्याच्या पाण्यावर नेवासा तालुका पूर्णतः अवलंबून असताना जाणिवपूर्वक मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा घाट घातला जात आहे, तो दुर्दैवी आहे. राजकीय भूमिका ठेवून जर हा निर्णय घेतला जात असेल तर तो अन्यायकारक आहे.
समन्यायी पाणी वाटप कायदा संपूर्ण राज्यात लागू असतानाही फक्त मुळा व भंडारदराचे पाणी सोडले जाते इतर जिल्ह्यातील पाणी का सोडले जात नाही. मुळाचे पाणी सोडले गेले तर तालुक्यात दुष्काळ होईल.
गावा गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. दिला. मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, स्वप्नील काळे, सुधीर पाटील यांनी निवेदन स्वीकारले. प्रास्ताविक कारभारी जावळे यांनी, तर आभार माजी आ. पांडुरंग अभंग यांनी मानले.
लढा सुरूच ठेवणार
मुळाच्या पाण्याची बचत करून पुढे दोन रोटेशन करून तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुळाच्या पाण्यासाठी सुरू असलेले आंदोलन जरी तात्पुरते स्थगित केले असलेतरी मुळाच्या पाण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे आ गडाख म्हणाले.
पाणी सोडण्याची वेळ आली तर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व मुळा व प्रवरेवरील बंधाऱ्यावर फळ्या टाकून हे बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी आमदार गडाख यांनी केली.