राजकारण

MLA Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील बसस्थानके होणार सुसज्ज ! कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर

Published by
Ahmednagarlive24 Office

कर्जत -जामखेड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बसस्थानकांचे कॉक्रिटीकरण करणे तसेच सुलभ शौचालय बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता कर्जत जामखेडमधील एसटी आगार सुंदर आणि सुसज्ज होणार आहेत.

तसेच विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीच्या बसेस दोन्हीही तालुक्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आली होती, त्याही बसेस आता लवकरच उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि औद्योगिक महामंडळ यांच्यात नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान ६०० कोटी रुपयांचा करार झाला आहे. त्यातूनच मिरजगाव येथील बसस्थानकासाठी १ कोटी ९० लक्ष तसेच कर्जत येथील बसस्थानकासाठी १ कोटी ३६ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

जामखेड येथील बसस्थानकासाठी ४ कोटी ३६ लक्ष रुपये, खर्डा कोल्हार बसस्थानकासाठी १ कोटी ९ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. कर्जत येथील बसस्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आ. पवार यांनी परिवहन महामंडळाला पत्र दिले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना सरकार बदलल्यानंतर स्थगिती लावली होती. परंतु न्यायालयाने ही स्थगिती उठवल्याने कामे पूर्ववत झाली.

आ. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ‘कर्जत जामखेड’साठी जास्तीच्या ३० बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाचे सचिवांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे लवकरच नवीन २००० बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार असून, त्या आल्यानंतर कर्जत-जामखेडसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

सरकार कोणतेही असो, मतदारसंघातील लोकांसाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार तसेच माझ्या मतदारसंघातील जनतेला दिलेले बहुतांश शब्द मी जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे. एमआयडीसीचा प्रश्नही मी लवकरच मार्गी लावणार – आमदार रोहित पवार, कर्जत – जामखेड.

Ahmednagarlive24 Office