Kasba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याठिकाणी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज आहेत. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कसबा पेठमध्ये सध्या पोस्टर लागले आहेत. यावर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का? असे यावर लिहिले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल असे अनेकांना वाटत होते. मात्र हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुक्ता टिळक आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेल्या होत्या.
यामुळे येवढी पक्षनिष्ठा दाखवूनही अन्याय झाल्याचे सांगितले जात आहे. यातून ब्राह्मण समाज भाजपवर प्रचंड नाराज असल्याचा स्पष्ट इशाराच या बॅनर्सवरून देण्यात आला आहे. यामुळे निवडणूकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्राह्मण समाजाच्या आणि टिळक समर्थकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. यामुळे विजयी कोण होणार हे येणारा काळ ठरवेल. सुरुवातीला बिनविरोध होईल असे वाटणारी ही निवडणूक आता चांगल्याच रंगात आली आहे.