अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढत आहे. याचाच अर्थ मूळ शिवसेनेकडे ताकद आहे. ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.
अजून तरी त्या जागेच्या अदला- बदलीसंदर्भात चर्चा झालेली नाही. परंतू शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे त्या जागेसाठी योग्य उमेदवार असल्याचे मत शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
खासदार राऊत यांनी सोमवारी शिर्डी येथे साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून महाविकास आघाडी बनली असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडी हा एक महाविकास
आघाडीचा भाग असून आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे यांच्या हस्ते खासदार
राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आघाडीतील कॉँग्रेसचे नेते डॉ. एकनाथ गोंदकर,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे राहाता तालुकाप्रमुख सचिन कोते, शहरप्रमुख संजय शिंदे, लोणी खूर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे, उपशहरप्रमुख सुयोग सावकारे, शिर्डी शहर संघटक अमोल गायके, पुंडलिक बावके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.