Koprgaon Politics : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा काळे अन कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. या मतदारसंघात काळे अन कोल्हे हे परंपरागत विरोधक आहेत. मात्र मध्यंतरी महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्यात, जे राजकीय भूकंप झालेत त्यामुळे राज्यात काही नवीन समीकरणे उदयास आले आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झालेत. एक गट अजित पवार यांचा आणि एक गट शरद पवारांचा. दरम्यान, अजित पवार गटाने सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे देखील अजित पवार यांच्या समवेत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
अर्थातच कोपरगावात भारतीय जनता पक्षात असणारे कोल्हे आणि अजित पवार गटातील काळे हे एकाच गटात आलेत. खरंतर, विधानसभा निवडणूकीत कोपरगावची जागा अजित पवार गटाला गेली आणि येथून अजितदादांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना संधी दिली.
यामुळे कोल्हे वेगळी भूमिका घेणार आणि शरद पवार गटात जातील आणि तुतारी घेऊन निवडणूक लढवतील अशा काही चर्चा मध्यंतरी समोर आल्या होत्या. युवा नेते विवेक कोल्हे हे कोपरगावातून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीतही होते.
यानुसार त्यांनी चाचपणी सुरू केली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी कोल्हे यांची मनधरणी केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने कोल्हे यांची मनधरणी करण्यात बीजेपीला यश आले.
यामुळे परंपरागत काळे आणि कोल्हे यांच्यातील सामना यंदा काही घडत नाहीये. कोल्हे अजूनही महायुतीचाच भाग आहेत. परंतु, काळे यांच्या प्रचारात अजून तरी कोल्हे आणि त्यांचा गट फारसा सक्रिय नाहीये. कोल्हे आणि त्यांचे कार्यकर्ते काळे यांच्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत.
अशा या परिस्थितीतच आता मंत्री गिरीश महाजन यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. टोकाची भूमिका असलेले अजितदादा आमच्या सोबत आले. आता आम्ही त्यांच्यासोबत बसतोच. तसेच, कोपरगावमध्ये सुद्धा काळे- कोल्हे निश्चितच एकाच मंचावर दिसतील, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोपरगावात काळे-कोल्हे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. म्हणून कोल्हे आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारात कुठेही सक्रिय झालेले दिसले नाहीत.
त्यामुळे महायुतीतील हा पेच सोडवण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन काल रात्री कोपरगावमध्ये आले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी महायुतीचे उमेदवार अर्थातच आशुतोष काळे यांचे काम करण्याचे आदेश भाजप कार्यकर्त्यांना दिलेत.
गिरीश महाजन काय म्हटलेत ?
गिरीश महाजन यांनी कोपरगावात बोलताना, कोल्हे परिवाराला विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडून ऑफर आली. मात्र ते डगमगले नाहीत आणि पक्ष सोडला नाही. त्यांनी बंडखोरीही केली नाही आणि दुसऱ्या पक्षात सुद्धा गेले नाही. त्यामुळे भविष्यात नक्कीच त्यांचा विचार केला जाईल. विवेक कोल्हे उगवतं नेतृत्व आहे. या अशा नेतृत्वाची भाजपला गरज आहे.
सत्ता असो किंवा नसो आमच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हेंना जो शब्द दिला तो पाळला जाईल. टोकाची भूमिका असलेले अजितदादा आमच्या सोबत आले. आता आम्ही त्यांच्यासोबत बसतोच ना. तसेच कोपरगावमध्ये देखील होणार आहे. काळे- कोल्हे निश्चितच एकाच मंचावर दिसणार आहेत. महायुतीला यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळेल आणि महायुतीच्या किमान १७५ जागा निवडून येतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी बोलून दाखवलाय.
यामुळे खरंच परंपरागत विरोधक काळे आणि कोल्हे एकत्र येणार का? कोल्हे खरंच काळे यांच्या प्रचारात सामील होणार का? असे काही प्रश्न उपस्थित झालेत. यामुळे कोपरगावच्या राजकारणातील हे दोन परंपरागत विरोधक आता एकाच मंचावर पाहायला मिळणार का ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे.