लोकसभा निवडणूकीत नीलेश लंके हे विजयी व्हावेेत यासाठी पायात चप्पल न घालण्याचा संकल्प देहरे येथील नितीन भांबळ या नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या युवा कार्यकर्त्याने केला होता. मंगळवारी लंके यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर लंके यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत महाराष्ट्र सदर येथे नितीन याने पायात चप्पल घातली.
लोकसभा निवडणूकीसाठी नीलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नितीन भांबळ यांनी पायातील चप्पल सोडून प्रचारास सुरूवात केली. सर्वसामान्य जनतेसाठी आहोरात्र झटणाऱ्या नीलेश लंके यांनी आतापर्यंत हजारो गोरगरीब जनतेला मदतीचा हात दिला आहे. कोरोना काळात नीलेश लंके यांनी हजारो कोरोना बाधितांना मोफत उपचार दिले.
आता संसदेमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा खासदार नीलेश लंके यांच्या रूपाने पाठवायचा हे ध्येय डोळयासमोर ठेउन नितीनने मे महिन्यातील उन्हामध्ये पायात चप्पल न घालता नितीन याने संपूर्ण नगर तालुका पिंजून काढला.
४ जुन मतमोजणीचा दिवस उजाडला आणि नितीन याने देवाजवळ प्रार्थना करीत लंके यांच्या गळयात विजयश्री पडावी यासाठी साकडे घातले. प्रत्यक्षात मतमोजणीस सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये लंके हे पिछाडीवर पडले आणि नितीनच्या काळजाचा ठोका चुकला.
मात्र नीलेश लंके हे ही पिछाडी भरून काढून नक्कीच विजयाकडे वाटचाल करतील याचा विश्वास त्याला होता. अखेर पिछाडी भरून काढत लंके यांनी आघाडी घेतली ती अखेरपर्यंत टीकवत नीलेश लंके यांना विजयी घोषीत करण्यात आले.
लंके यांना विजयी घोषीत केल्यानंतर नितीन याची खऱ्या अर्थाने संकल्पपुर्ती झाली होती. मात्र लोकशाहीच्या पवित्र मंदिरात शपथ घेतल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा निर्धार नितीन याने केले. अखेर मंगळवारी नीलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेतली आणि बुधवारी सकाळी लंके यांनी दिल्लीत स्वतः चप्पल खरेदी करून नितीन याच्या पायामध्ये घातली.
यावेळी संजय गारूडकर, शिरीष काळे, सुनील कोकरे, सचिन काळे, राजेंद्र दौंड, संजय तरटे, दिलीप लाळगे, शशी गव्हाणे आदी उपस्थित होते.