Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत असून या निवडणुकीत जनता जनार्दन कोणाला कौल देणार हे पाहण्यासारखे राहील.
यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तीन पक्ष महाविकास आघाडी मध्ये आहेत.
अर्थातच यंदाच्या निवडणुकीत प्रथमच हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या फायर ब्रँड नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सुरू करण्यात आला असून महायुती आणि महाविकास आघाडी आमचेच सरकार येणार असा दावा करत आहेत.
परंतु राज्याच्या राजकीय वर्तुळात झालेल्या भूकंपानंतर, मध्यंतरी राज्याच्या राजकारणात जी काही नवीन समीकरणे तयार झाली आहेत त्या समीकरणानंतर महाराष्ट्रात यंदा कोणाचे सरकार येणार या गोष्टीचा अंदाज बांधणे फारच कठीण होत आहे. अशातच आता आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाने एक प्रीपोल सर्व्हे केला आहे.
या मतदानपूर्व सर्व्हे तून राज्यात कोणाचं सरकार येणार ? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयएएनएसच्या सर्व्हेत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. यात महायुती पुन्हा सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचून आणू शकते असे दिसते.
कारण की या प्रीपोल मध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीची बाजू स्ट्राँग दिसत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या महायुतीला मिळून 145 ते 165 जागा मिळण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे. अर्थातच यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पाहायला मिळणार असा अंदाज या सर्वेमधून समोर आला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची महाविकास आघाडी 106 ते 126 जागांवर विजयी होऊ शकते असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता यामध्ये सांगितली गेली आहे. मात्र हा एक फक्त अंदाज असून 23 तारखेला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशीच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे क्लिअर होणार आहे.
कोणत्या विभागात कोणाला किती जागा?
विदर्भातील एकूण 62 मतदारसंघापैकी 32 ते 37 जागांवर महायुतीला यश मिळू शकतं, तर आघाडीला 21 ते 26 जागा मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 मतदारसंघापैकी आघाडीला 29 ते 32 जागा, तर 31 ते 38 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील 46 पैकी 18 ते 24 जागांवर महायुती तर 20 ते 24 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. कोकण विभागातील 39 पैकी 23 ते 25 जागा महायुतीला तर, 10 ते 11 जागांवर आघाडीला मिळू शकतात.
मुंबईतील 36 जागांपैकी 21 ते 26 जागा महायुतीला तर 16 ते 19 जागा आघाडीला मिळण्याचा अंदाज या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील 14 ते 16 जागांवर युतीला आणि 16 ते 19 जागा आघाडीच्या वाट्याला जाण्याचा अंदाज आहे.