Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला जबर फटका बसला. भाजपच्या लोकसभेच्या जागा २३ वरुन थेट ९ वर घसरल्या आहेत. तर आगामी विधानसभेची निवडणूक आता अवघ्या ४ महिन्यांवर आली आहे. मात्र लोकसभेतील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.
त्यामुळे महायुतीत आता हा पराभव कोणामुळे झाला यावरून वेबनाव निर्माण झाला असून, अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचे मत आहे. अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याची चर्चा आहे. एकूणच भाजपसह शिंदे गटाला हा तिसरा मित्र उपयोगी ठरला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने मोठी झेप घेतली. या पराभवानंतर भाजपचे नेते आणि राज्यातील मंत्र्यांनी पुण्यातील संघ कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यात प्रामुख्याने चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट लोकसभेतील पराभवाबद्दल चिंतन केलं.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने ३० जागांवर बाजी मारली. पक्षाच्या नेतृत्त्वाने आणि संघाने महायुतीच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यातील सद्यस्थिती भाजपसाठी सकारात्मक नसल्याचे भाजप नेत्यांना सांगितले आहे .त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता टिकवायची असल्यास अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील, असेही संघाकडून भाजप नेत्यांना सांगण्यात आलेले आहे.
तर दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचे मत आहे. अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचे खासगीत बोलले जात आहे, एकूणच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर आता अजित पवार गटावर फोडण्यात येत आहे.
त्यामुळे आगामी काळात पवार यांना सोबत घेण्याबाबत परत एकदा विचार करावा अशी देखील चर्चा केली जात आहे. पर्यायाने या पुढील काळात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.