राजकारण

Maharashtra Politics : अर्थसंकल्पापर्यंत राजकीय बदलाची शक्यता नाही? नंतर मात्र राजकारणात उलथापालथ …!

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले , तर महायुतीला चांगलाच फटका फटका बसला आहे. या पराभवानंतर आता भाजपाकडून याबाबत मंथन सुरु झाले आहे. अशातच भाजपाच्या बैठकीत काही नेत्यांनी या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्यात सध्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. तर जूनच्या शेवटाला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे निदान अर्थसंकल्पापर्यंत तरी महाराष्ट्रात राजकीय बदल होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे. जुलै महिन्यात मात्र मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

अर्थमंत्री अजितदादा पवार अंदाजे येत्या २८ जूनला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने उरलेले असताना हा अर्थसंकल्प सरकारसाठी किंबहुना भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे.

राज्यात सध्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर भाजपच्या पराभवाचे खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर फोडले आहे. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला.

तसेच अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या, चर्चा सुरु आहेत. त्यात लोकसभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात कधीही राजकीय उलथापालथ होऊ शकते अशी परिस्थिती आहे.

असे असले, तरी निदान अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तरी काहीही होणार नाही. कारण अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसारच आमदारांना किती निधी मिळणार, हे निश्चित होत असते. आणि एकदा अर्थसंकल्पात तरतूद झाली, की उशिराने का होईना तो निधी मिळतोच. निदान त्यासाठी न्यायालयात तरी जाता येते.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे व अजित पवार गटाचे अनेक आमदार स्वगृही परत जाण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

Ahmednagarlive24 Office