केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार नीलेश लंके यांची बुधवारी संसद परिसरात भेट झाल्यानंतर गडकरी यांनी लंके यांना आपुलकीने जवळ घेत आस्थेने विचारपुस केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन मतदारसंघातील कामांसाठी आपण सदैव पाठीशी असल्याचा संदेशही दिला. दरम्यान, गडकरी यांना पाहून समाजसेवेची उर्जा मिळते अशा भावना लंके यांनी यावेळी व्यक्त केल्या.
सन २०२९ मध्ये विधासभा सदस्य म्हणून महाराष्ट्र विधीमंडळात काम करण्यास सुरूवात केल्यानंतर नीलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून मंत्री नितिन गडकरी यांची अनेकदा भेट घेतली होती. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामगिरीमुळे प्रकाश झोतामध्ये आलेल्या लंके यांच्याविषयी स्वतः गडकरी यांनाही आकर्षण होतेच. लंके यांच्या कामाचे त्यांनी दिलदारपणे कौतुकही केले होते.
हजारे यांच्या माध्यमातून भेट झाल्यानंतर गडकरी व लंके यांच्यात जवळीक निर्माण झाली. अनेकदा त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी गडकरी यांच्या भेटीही घेतल्या. काही कामे मार्गी लागली, मात्र लंके हे संसद सदस्य नसल्याने कामे करून घेण्यात त्यांना मर्यादा येत होत्या. आता मात्र लंके हे संसद सदस्य झाल्यामुळे मंत्री गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आखत्यारीतील कामे मार्गी लावून घेण्यात लंके यांना अडचण येणार नाही.
गडकरींच्या हस्ते पुरस्कार हे भाग्य
लोकमत वृत्तसमुहाने लंके यांना कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला होतेा. त्यावेळी बोलताना लंके म्हणाले होते की, लोकमतने मला कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल पुरस्कार दिला. हा पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते दिला हे माझे भाग्य आहे. ज्या माणसाने गाव, शहर, राज्या-राज्यांमध्ये रस्त्यांचं जाळं उभे केले त्यांच्या हस्ते पुरस्कार घेताना मला आनंद होत असल्याच्या भावना लंके यांनी व्यक्त केल्या होत्या.
आणि पाथर्डी रस्त्याचे काम सुरू झाले
अहमदनगर, पाथर्डी, नांदेड, निर्मल तसेच अहमदनगर, राहुरी, शिर्डी कोपरगांव या रस्त्यांचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यासाठी नीलेश लंके हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. स्थानिक प्रशासनाकडून लंके यांच्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर अजित पवार हे लंके यांच्या भेटीसाठी नगर येथे आले होते. पवार यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून रत्यांची दुर्दशा, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होउन गेलेले बळी याबाबत माहीती दिली. गडकरी यांनी त्यावेळी लंके यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सुचना देत गडकरी यांनी हे काम तात्काळ सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. गडकरी यांच्या सुचनेनुसार त्याच दिवशी या कामास सुरूवात झाली आणि लंके यांचे उपोषण गडकरी यांच्या तत्परतेने सुटले होते.
गडकरींकडे पाहून उर्जा मिळते
देशाच्या रस्ते उभारणीत ज्यांचे बहुमुल्य योगदान आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज संसद भवन परिसरात भेट झाली. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली. दिलखुलासपणे संवाद साधला. ज्यांच्याकडे पाहून समाजसेवेची उर्जा मिळते.