राजकारण

Ahmednagar Politics : नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आमदार लंके यशस्वी..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती. मात्र, नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड करण्यात आली.

पारनेर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. बाजार समिती निवडणुकीनंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले होते. आ. निलेश लंके यांच्या सुचनेनुसार सव्वा वर्षांसाठीच्या पदाचा कार्यकाल ठरवला होता.

त्यानुसार दि.२३ रोजी सकाळी सुरेखा भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, नगराध्यक्ष विजय औटी हे प्रथम राजीनामासाठी तयार नसल्याची चर्चा होती. नगराध्यक्ष विजय औटी राजीनामा देण्यास विलंभ करत असल्याचे चित्र दिसल्यामुळे विरोधकांमध्ये मोर्चेबांधणीला व चर्चेला ऊत आला होता.

परंतू आ. लंके यांच्या यशस्वी राजकीय खेळीमुळे विरोधकांच्या सर्व आराखड्यांवर पाणी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. सायंकाळी चारच्या सुमारास नगराध्यक्ष विजयराव औटी यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगरपालिका विभागाचे सह आयुक्त प्रशांत खांडगेकर यांच्याकडे दिला व आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गटनोंदणीमध्ये सदस्य म्हणून हजर झाले.

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची गटनेते पदासाठी बैठक पार पडली. यामध्ये नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांच्या नावावर गटनेते म्हणून शिक्कामार्फत झाले. गटनेते पदाचे पत्र सह आयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्याकडे देण्यात आले.

परंतु जिल्हाधिकारी निवडणूक प्रशिक्षणाच्या कामकाजामुळे उपलब्ध नसल्याने नगरपालिका विभागाचे सह आयुक्त खांडगेकर यांनी राजीनामा व गटनेते पदाचा अर्ज स्वीकारला असून, त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या गटातील नगरसेवक प्रियंका सचिन औटी, विजय सदाशिव औटी, विद्या बाळासाहेब कावरे, सुरेखा अर्जुन भालेकर, हिमानी रामजी नगरे, भूषण उत्तम शेलार, नीता विजय औटी, नितीन रमेश अडसूळ, सुप्रिया सुभाष शिंदे, अशोक फुलाजी चेडे, योगेश अशोक मते, अशा अकरा जणांची गटनोंदणी करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासंदर्भात निवडणूक प्रक्रिया होणार असून, राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण होणार, हे आ. लंके ठरवणार असून, या महत्त्वाच्या पदासाठी कुणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे •लक्ष लागून राहिले आहे.

पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाची गटनोंदणी करण्यात आली असून, यात अपक्षांसह भाजपचे नगरसेवक अशोक चेडे यानी सहयोगी सदस्य म्हणून आपल्या नावाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार ११ सदस्याची गटनोंदणी करण्यात आली असून, गटनेतेपदी पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांची निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

Ahmednagarlive24 Office