Maharashtra News : भाजपने ज्या लोकांवर आरोप केले, ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ते लोक भाजपमध्ये आल्यानंतर त्या घोटाळ्यांचे काय होते, हे सर्वांना माहीत आहे. बारामती ऍग्रो कंपनीवर ईडीची धाड पडली.
अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरात असताना दिवसाढवळ्या गँगवॉर होते. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले.
आ. रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या ६ कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली. ७ ते ८ तास ही छापेमारी सुरू होती. रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी झाली. या छापेमारीवर रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
परदेशातून येताच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मी अजिबात घाबरलो नाही. लोकांना कारवाई का केली? कशी केली? माहीत आहे. अधिकाऱ्यांचे काहीही चुकलेले नाही. त्यांना जे सांगितलं जातं, तेच ते करतात. ते येतात, कागदपत्रं तपासतात आणि जातात, असे रोहित पवार म्हणाले.
आम्हाला राजकारण करायचं नाही
ज्या गोष्टी मला माहीत नाहीत, त्याची मला मीडियातून माहिती मिळते. कागदपत्रे जप्त झाल्याची बातमी मीडियातूनच समजते. गुप्त कागदपत्रे हा ईडी आणि आमच्यातील विषय होता.
तो मीडियाला कसा कळला? याचं आश्चर्य आहे. आम्ही तर ती कागदपत्रं पाठवली नव्हती. यावरून समजून घ्या. काही लोकांना यात राजकारण करायचं आहे. उलट आम्हाला तर राजकारण करायचं नाही.
राज्यात दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद बाजूला ठेवावे आणि फक्त गृहमंत्रिपद सांभाळावे आणि तिथे तरी न्याय द्यावा. ते काय करतात, त्यावर त्यांनी जास्त बोलावे. दुसऱ्यांच्या गोष्टींवर जास्त बोलू नये, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.