राजकारण

Ahmednagar Politics : आमदार रोहित पवारांच्या निर्णयाला गावातूनच होतोय विरोध ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील पाटेगाव – खंडाळ्यात एमआयडीसी सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला असताना, पाटेगावमध्ये झालेल्या ग्रामसभेत मात्र ८० टक्के उपस्थित ग्रामस्थांनी एमआयडीसीला विरोध केला आहे. तर उर्वरित लोकांनी जाचक अटी घालून परवानगी देण्यास हरकत नसल्याचे मत मांडले आहे.

कर्जत -जामखेड मतदारसंघाच्या मध्यवर्ती खंडाळा पाटेगावमध्ये एमआयडीसी सुरू व्हावी, यासाठी आ. रोहित पवार यांनी प्रयत्न करत जोरदार रणनीती आखली, या भागाची पाहणीही महविकास आघाडी काळात पूर्ण केल्याचे सांगत फक्त अधिसूचना काढायची बाकी असून,

ती त्वरित काढावी, अशी मागणी करत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तर पावसात आंदोलनही केले. तर याच वेळी आ. प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघात एमआयडीसी झालीच पाहिजे, अशी भूमिका विधानपरिषदेत मांडताना, यासाठी आपल्या कार्यकाळात आपण पाठपुरावा केला होता, असे म्हणत सध्या मात्र नीरव मोदींसह इतर धनिकांच्या जमिनीसाठी एमआयडीसी करायची आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत या विषयात ट्विस्ट आणला.

यावर दोन्ही बाजूने उलट सुलट चर्चा, आरोप प्रत्यारोप आंदोलने, असे बरेच काही सुरू असताना मंगळवार, दि. १ ऑगस्ट रोजी पाटेगावमध्ये ग्रामसभा झाली. सरपंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हर्षल शेवाळे यांच्या उपस्थितीत या वेळी अनेक नागरिकांनी आमची बागायती शेती जात असल्याने विरोध केला तर एमआयडीसीमध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे गावाला धोका निर्माण होतो, असे मत व्यक्त केले गेले.

या वेळी अनेक नागरिकांनी विरोध केला तर जिरायत जमिनीला शासनाने चांगला भाव दिला तर फक्त जिरायत भागात एमआयडीसी करायला हरकत नसल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले. मात्र, होणाऱ्या एमआयडीसीमध्ये केमिकलच्या व प्रदूषण करणाऱ्या कंपन्या येऊ नयेत,

असे मतही व्यक्त केले. या वेळी काँग्रेसचे नेते कैलास शेवाळे यांनी बोलताना जिरायत जमिनीला शासनाने ८० लाख रुपये एकराने पैसे दिले, व बागायत क्षेत्र वगळून फक्त जिरायत जमिनीवर (पडीक) जमीनीवर एमआयडीसी करण्यास हरकत नाही, असे म्हणत लोकांची संमती विचारली असता,

पुन्हा गदारोळ उठला. या वेळी अनेकांनी मते व्यक्त केली, काहींनी युवकांच्या भविष्यासाठी एमआयडीसी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. मात्र, यासाठी गावाने अनेक नियम व अटी ठेवून परवानगी द्यावी, असे म्हटले. या वेळी माजी सरपंच गोकुळ इरकर, सतीश डुकरे, सत्यवान भंडारे, सोपानराव जाधव, संदीप महारनवर, बाळासाहेब कदम, युवराज लाड, महादेव शिंदे, नवनाथ डुकरे, दादा पाटील, प्रकाश देवकर आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office