MNS BJP : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. असे असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करु शकतात, मनात एक ठेवायचे आणि बोलायचे वेगळ असे राज ठाकरे नाहीत.
कपट कारस्थान करणारे राज ठाकरे नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यावर आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांच्या मनात भाजपसोबत यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नेहमी दरवाजे खुले आहेत, असे म्हणत त्यांनी एक मोठे संकेत दिले आहेत.
तसेच बावनकुळे म्हणाले, वैचारिक मनोमिलनासाठी आम्ही कुठेही चर्चा केलेली नाही. राज ठाकरे आमचे एक चांगले आणि दिलदार मित्र आहेत. ते खुल्या मनाने आणि खुल्या विचाराने बोलणारे व्यक्तीमत्व आहेत, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची देखील भेट झाली होती. यामुळे काहीतरी सुरुय, असे म्हटले जात आहे.