Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी म्हणजे येत्या ४ जूननंतर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याच्या आड सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे होय, अशी तिखट टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.
राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक स्थानिक पोलिसांना सूचित न करताच पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याच्या भूपतीनगरमध्ये आले. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा पलटवार त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बाकुंडा येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी त्या भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगल्याच कडाडल्या. नरेंद्र मोदी प्रचारसभा घेण्यासाठी बंगालमध्ये येत आहेत. मला त्यांची अडचण नाही.
परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची भाषा ते करीत आहेत. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. पंतप्रधानांच्या तोंडी विरोधकांना गजाआड करण्याची भाषा शोभत नाही. निवडणुकीनंतर भाजप नेत्यांना गजाआड करण्याचे वक्तव्य मी करू शकते.
पण, मी तसे करणार नाही. कारण, लोकशाहीत अशा गोष्टी अमान्य असतात, असे ममता म्हणाल्या. वास्तविक पाहता ‘मोदी गॅरंटी’ म्हणजे ४ जूननंतर सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे होय, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. विशेष बाब अशी की, ‘एनआयए’च्या पथकावर गेल्या शनिवारी जमावाने हल्ला केला.
२०२२ सालच्या बॉम्बस्फोटप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यासाठी एनआयएचे पथक पूर्व मेदिनीपूरमध्ये आले होते. या हल्ल्यावरून मोदी व ममता बॅनर्जी यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप ममतांनी केला.
त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. आम्हाला भ्रष्टाचार मिटवायचा आहे. पण, तृणमूल काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा पलटवार मोदींनी केला. येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच आम्ही भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणार असल्याचे मोदी म्हणाले.