Maharashtra News : लोकशाही मार्गाने मागण्या करणाऱ्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून तुरुंगात टाकण्यात आले आहे. मागील महिन्याभरापासून केजरीवाल तुरुंगात असून, इतर राज्याचे नेते, लोकप्रतिनिधींबाबतही अशीच अन्यायकारक भूमिका घेतली जात आहे.
केंद्रीय सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय दृष्टिकोन नाही, ते देशाचे नव्हे तर केवळ भाजपचे नेते आहेत. विकासात्मक कामे करण्याऐवजी ते टीका करण्यावर अधिकाधिक भर देत आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होऊन हुकूमशाही येईल, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केला.
महागाई, बेरोजगारीपुढे गॅरंटी फेल
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा शेतकरी आज प्रचंड संकटात आहे. शेतीला पाणी नसल्याने फळबागा जळून जात असताना मोदींकडून विरोधकांवर तोंडसुख घेतले जात असल्याचीही टीका त्यांनी केली.
पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी यांनी ५० दिवसांत महागाई कमी करू, असे जाहीर केले होते. परंतु आता १० वर्ष पूर्ण होत असतानाही त्यांना ते करता आले नाही.
या उलट पेट्रोल, डिझेल आणि अन्य वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे पवार म्हणाले. एका जगविख्यात संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतात ८७ टक्के उच्च शिक्षण घेतलेले तरुण बेरोजगार असल्याचे समोर आणले आहे.
या तरुणांच्या रोजगाराची गॅरंटी पंतप्रधान मोदी देणार का? तिथे गॅरंटी फेल का झाली? असाही प्रश्न त्यांनी या वेळी केला. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही मतदारसंघांत जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी राहील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.