अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल पारनेरमध्ये बोलताना तालुक्यात भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचे वक्तव्य करून जिल्ह्याच्या राजकारणात धमका केला होता.
तर दुसऱ्याच दिवशी विखेंच्या वक्तव्याला काही अर्थ नसल्याने सांगत शिवसेनेने तो फुसका बार ठरविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या वयोश्री योजनेचा कार्यक्रम पारनेर तालुक्यात आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी डॉ. विखे यांनी शिवसेनेसंबंधी हे वक्तव्य केले होते. शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांसह काही पदाधिकारी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी यावर प्रतिक्रिया देत विखे यांचे हे वैयक्तिक मत असून त्याला काहीही अर्थ नसल्याचे सांगितले. शिवसेना कोणत्याही निवडणुका भाजपसोबत लढविणार नाही, असेच पक्षाचे धोरण आहे.
पक्षप्रमुख आणि पक्ष निरीक्षकांकडूनही बैठकांमधून वारंवार हेच सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकांसाठी त्यानुसारच नियोजनही केलेले आहे.
त्यामुळे पारनेर तालुक्यातही शिवसेना भाजपसोबत जाण्याचा विचारही नाही, असे सांगत गाडे यांनी या शक्यतेतील हवा काढून घेतली आहे. मात्र, यानिमित्ताने पारनेरमधील शिवसेना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.