MP Sujay Vikhe vs MLA Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्यामध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध खासदार सुजय विखे असा राजकीय वाद पेटला आहे. तसेच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप सुरु आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक लंके विरुद्ध विखे अशी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. ३०) भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे आमने-सामने आले. त्याचवेळी लंके यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
ते पाहून विखे यांच्या कार्यकर्त्याने विखे यांची घोषणा दिली अचानक झालेल्या या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले लोक मात्र बुचकळ्यात पडले. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी नगर शहरात मोकळ्या जागा बळकावण्यात येत असल्याच्या मुद्द्यांवरुन अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केलेले होते.
या मोर्चाच्या निमित्ताने तसेच इतर कामाच्या निमित्ताने पारनेरचे आमदार निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले होते. त्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते लंके यांच्यासोबत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसन्या मजल्यावर खासदार विखे उत्तरेतील शेतकऱ्यांचे काही प्रश्न घेऊन आलेले होते.
त्याचवेळी आमदार लंके जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लंके यांच्यासोबत फोटो काढण्यास सुरुवात केली त्याचवेळी विखे हे पलिकडच्या बाजूला उभे होते, ते पाहून लंके यांच्या कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
ते पाहून विखे यांच्या कार्यकत्यांनीही घोषणा दिल्या. विखे-लंके यांच्यातील वाद जिल्ह्याला परिचित आहेत. लंके हे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असल्यामुळे विखे परिवार ही लंके यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
लंके यांच्यावर महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे वारंवार टीका करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच विखे-पाटील यांनी लंके यांना पुन्हा निवडून यायचे नसेल, असे वक्तव्य केले होते. लंके यांनीही तुमचा मुलगा कसा खासदार होतो,
हे आम्ही पाहू, असे जोरदार प्रत्युत्तर विखे-पाटील यांना दिले होते. त्यानंतर गणेश कारखाना निवडणुकीतही लंके यांनी विखे-पाटील यांच्यावर जोरदार टीका करीत दडपशाहीचा पराभव झाल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर प्रथमच विखे- लंके हे आमने-सामने आले होते.
लंकेंचा उल्लेख भावी खासदार खासदार
डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासमोर आमदार नीलेश लंके यांची घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांनी लंके यांचा उल्लेख भावी खासदार असा केला. तसेच लंकेसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. भावी खासदार नीलेश लंके यांचा विजय असो, अशा जोरदार घोषणा कार्यकर्ते देत होते. ते पाहून विखे यांच्या कार्यकत्यांनीही सुजय विखे यांचा विजय असो अशी घोषणाबाजी केली.