Nagar Politics News : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अन सहकाराचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याला ओळखले जाते. यासोबतच राज्याच्या किंबहुना देशाच्या राजकारणात अहिल्यानगरचे एक वेगळे स्थान आहे. यामुळे 12 विधानसभा मतदारसंघाच्या या जिल्ह्यात सर्वच पक्षांचे विशेष लक्ष आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाच्या माध्यमातून सध्या अहिल्या नगर जिल्ह्याकडे लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील काही जागांवर यंदा अगदीच काटेदार लढत होण्याची शक्यता आहे.
तर काही ठिकाणी यंदा काही उमेदवारांचे पारडे अधिक जड भरत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर इथं महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दुसरीकडे या जागेवर महाविकास आघाडीला अजूनही तुल्यबळ उमेदवार सापडलेला नाही. शहराचे माजी महापौर संदीप कोतकर हे येथून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत मात्र कायदेशीर बाबींमुळे कोतकर यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
खरे तर महायुतीचे अनेक जागांवरील उमेदवार ठरले आहेत पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. नगर शहरातही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चांगलाच मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. विश्वासं जुना संग्राम भैया पुन्हा असं म्हणत विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रचारात जगतापांची आघाडी आहे हे वेगळे सांगायला नको.
लोकसभा निवडणुकीपासूनचं जगताप यांनाच ही जागा मिळणार हे जवळपास नक्की झाले होते. यानुसार, महायुतीने जगताप यांच्यावर विश्वास दाखवला असून आता ते नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक लावणार का? सलग तिसऱ्यांदा जगताप विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व करणार का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या निवडणुकीत संग्राम भैया जगताप यांनी दणदणीत विजय मिळवला होता.
शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत झालेली असतानाही जगताप यांनी गेल्यावेळी बाजी मारली होती. त्यावेळी राष्ट्रवादी एकसंघ होती. आता राष्ट्रवादीत उभी फूट पडलेली आहे आणि जगताप हे सध्या अजित दादा समवेत आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून मतदार संघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही जगताप यांना टक्कर देईल असा कोणीही तुल्यबळ उमेदवार सापडत नाहीये. महाविकास आघाडी मधील काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तीनही पक्ष या जागेसाठी दावा करत आहेत.
यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच असल्याचे उघड झाले आहे. जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा कोरोना पीक वर होता. त्यामुळे सुरुवातीची दोन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांना अपेक्षित कामे करता आली नाहीत. मात्र ते महायुती सरकारचा भाग झालेत तेव्हापासून त्यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये कोट्यावधीचा निधी आणला आहे. कदाचित हेच कारण असावे की त्यांनी मोठ्या साहेबांऐवजी अजितदादांकडे राहणे पसंत केले.
अजित दादा गटात असल्याने ते सध्या सत्तेत आहेत आणि सत्तेत असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेत आहेत. याचा फायदा म्हणून नगर शहरात गेल्या काही वर्षात मोठमोठी विकास कामे पाहायला मिळत असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी जगताप यांनी आणलेल्या निधीमधून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झालीत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी आणला गेला. त्यातून उद्यानांची कामेही काही प्रमाणात मार्गी लागली.
शिवाय गेल्या आठवड्यात सीना नदी व भिंगारनाला सुशोभिकरणासाठी २० कोटींचा निधी मिळालाय. महापालिकेला तसे पत्रही आलेय. त्यामुळे दर पावसाळ्यात होणारा पुराचा त्रास कमी होणार आहे. याशिवाय स्वच्छता, भूमिगत गटारी, कचरा आदींचे प्रश्नही गेल्या वर्षभरात सोडण्याचा प्रयत्न झालाय. जगतापांनी गेल्या काही दिवसांपासून सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषेचा प्रश्नही चांगला हाताळला असल्याचे स्पष्ट दिसते. नागापूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठाणगे मळा, काटवन खंडोबा रोड, स्टेशन रस्ता, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा प्रश्न कायम चर्चेत असायचा.
आ. जगतापांनी प्रयत्न करुन पूर नियंत्रण रेषेचा लाल व निळ्या रेषांचा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील नागरीकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटलाय. या परिसरातील जागा मालकांना आता त्यांच्या जागा विकसित करता येणार आहेत. यामुळे या भागातील संबंधित जागा मालकांच्या माध्यमातून जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. या सर्व विकास कामांचा लेखाजोखा पाहिला असता जगताप यांनी पहिल्या टर्म प्रमाणेच दुसऱ्या टर्ममध्येही चांगली कामगिरी करून दाखवली आहे.
यामुळे जगताप हे यंदाच्या निवडणुकीतही आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मत मागण्यासाठी मतदारांमध्ये जाणार आहेत किंबहुना त्यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर यंदाच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. नगर शहराचा आकाराने विकास दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे नवीन प्रश्न ही जन्म घेणार आहे. यामुळे हे नवीन प्रश्न सोडवण्यासाठी देखील आपला हक्काचा माणूस सत्तेवर असणे आवश्यक आहे. यामुळे जगताप यांना विजयी करा असे आवाहन महायुतीच्या सर्वच घटक पक्षांकडून केले जात आहे.
त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांचे कार्यकर्ते देखील ‘विश्वास जुना संग्राम भैय्या पुन्हा’ अशी घोषणा देत नगर शहर प्रचारात सध्या आघाडी घेऊन आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अजून त्यांच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार सापडत नसल्याने कदाचित त्यांचा विजयाचा मार्ग आणखी सोपा होऊ शकतो असे नगरच्या राजकीय विश्लेषकांकडून म्हटले जात आहे. यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून आपला बालेकिल्ला बनवणाऱ्या जगतापांना पुन्हा एकदा आपला गड शाबूत ठेवता येणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.