Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे.
राजकीय पक्ष आता आगामी निवडणुकीसाठी जनसंपर्क वाढवण्यात व्यस्त आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी देखील केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट ( शिर्डी लोकसभा ) युवक मेळावा नुकताच संपन्न झाला आहे.
अजित पवार गट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन काल अर्थातच 23 जानेवारी 2024 ला कोपरगाव येथील कृष्णाई बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते.
दरम्यान या मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या मंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले आहे. चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या वर्षी दोन जुलैला झालेल्या राजभवनातील घडामोडींच्या वेळी आमदार काळे परदेशात होते. यामुळे त्यावेळी झालेल्या घडामोडीत आमदार काळेंना वेळेत पोहोचता आले नाही.
परिणामी काळे यांचे मंत्रीपद हुकले मात्र असे असले तरी भविष्यात काळे यांना मंत्री पदाची संधी मिळणार असे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले आहे. पुढे बोलताना चव्हाण यांनी, कोरोना नंतर राज्यात काही कारणास्तव महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. परिणामी विकास कामे थांबलेत.
यामुळे राष्ट्रवादीच्या काही आमदारांची वेगळी भूमिका घेतली पाहिजे असे मत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांची हीच मागणी पाहता वेगळी भूमिका घेतली. यामुळे काळे यांना कोपरगावचा विकास करता आला.
यावेळी चव्हाण यांनी भाजप, शिवसेनेच्या सोबत असलो तरी देखील बारा बलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचे काम अजित पवार यांच्या माध्यमातून केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच चव्हाण यांनी आमदार काळे हे कधीच जाती-धर्माचे राजकारण करत नाहीत.
काळे विकास कामांचे राजकारण करतात. यामुळे आमदार आशुतोष काळे यांना यावेळी 50 हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्यांनी विजयी बनवण्याचा संकल्प करा असे आवाहन यावेळी उपस्थित युवक राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्त्यांना केले आहे.
एकंदरीत आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले असल्याने अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना आता उधाण आलेले आहे.