Newasa Politics News : सध्या अहिल्यानगर जिल्हा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघ देखील यापासून वंचित राहिलेला नाही. नेवासा हा जिल्ह्यातील एक सर्वाधिक चर्चेतला आणि लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
खरंतर, अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येतात आणि सहा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतात. नेवासाबाबत बोलायचं झालं तर हा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
नेवाशात गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष नावाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे माजी मंत्रीशंकरराव गडाख पुन्हा आमदार झाले होते. यावेळी गडाख पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या वेळी महाविकास आघाडीने त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून तिकिट दिलं आहे.
ते शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला गेली असून येथून शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना तिकीट दिले आहे. विठ्ठल लंघे यांनी ऐनवेळी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे देखील येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीकडून त्यांना तिकीट मिळाले नसल्याने त्यांनी बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहार पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. म्हणजे नेवासा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे.
खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झालाय. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभा निवडणुकीसारखाच शिर्डी पॅटर्न चालणार का? विधानसभा निवडणुकीत पुन्हा गडाख विजयी होणार की महायुती ही जागा आपल्याकडे खेचून आणणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.
शिर्डीत 2024 लोकसभा निवडणुकीला सेना विरुद्ध सेना असा थेट सामना झाला होता. भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना उबाठा पक्षातर्फे तिकिट मिळालं होतं. तर माजी खासदार सदाशिव लोखंडे शिंदेंच्या गोटात होते. महायुतीने शिवसेनेतर्फे त्यांनाच पुन्हा तिकिट दिलं होतं.
सदाशिव लोखंडे 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुका शिवसेनेतर्फे जिंकल्या होत्या. पण एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यावर लोखंडे यांनी शिंदेंना साथ दिली होती. दरम्यान लोखंडेंचा 4000 मतांनी शिर्डीतून पराभव झाला.
नेवासा मतदार संघातून लोखंडे पिछाडीवर होते. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगत आहे. दुसरीकडे, माजी आमदार मुरकुटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे गडाख यांना येथे थांबवायचे असेल तर भाजप-सेना महायुतीला नेवाशात जोर लावावा लागणार आहे.