Newasa Vidhansabha Matdarsangh : आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे चित्र आज अखेर स्पष्ट झाले आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ही तिरंगी होणार आहे.
या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाने आपला भिडू उतरवला आहे. शिंदे गटाने विठ्ठलराव लंघे यांना इथून उमेदवारी दिली असून महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शिवाय माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. खरेतर, शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना उमेदवारी मिळालेली असतांनाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आपल्या भिडूला एबी फॉर्म देण्यात आला होता.
अजित पवार गटाने अब्दूल शेख यांना पक्षाचा ए.बी.फॉर्म दिला होता, त्यानुसार शेख यांनी उमेदवारी दाखल केलेली होती. पण शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय. आता ते लंघे यांच्या प्रचारात सामिल होणार आहेत. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मात्र बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय.
मुरकुटे यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले नसल्याने आता नेवासा विधानसभा मतदारसंघातही यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अन विद्यमान आ. गडाख यांचे कार्यकर्ते पुन्हा गडाखचं आमदार होतील असा विश्वास व्यक्त करत आहेत.
तसेच, गेल्या दोन वेळा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अन पुन्हा एकदा विठ्ठलराव लंघे- पाटील यांना आमदार म्हणून पाहण्यासाठी लंघे समर्थक आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते विठ्ठलराव लंघे यांच्या विजयासाठी निवडणुकीच्या रणांगणात झुंज देण्यासाठी सक्रिय झालेले आहेत.
लंघे आणि त्यांचे कार्यकर्ते दोन निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असल्याने यावेळी पूर्ण तयारीनिशी मैदान काबीज करण्यासाठी सज्ज असून ते विजयाचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगत आहेत. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे पक्षाने उमेदवारी नाकारली असल्याने अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
आज ते निवडणुकीतून माघार घेणार की नाही याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती? आज अखेर त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यायची नाही हे स्पष्ट केले असून ते आता आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत. महत्वाचे म्हणजे या विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
शेवटच्या दिवशी अनेक उमेदवार निवडणुकीतून माघार घेणार असे म्हटले जात होते मात्र अनेकांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. म्हणून नेवासा विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.