Ahmednagar News : राज्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्ष सोडून निघून गेले. आता यांचे पक्ष केवळ नाममात्र राहिले असून त्यांची इंडिया आघाडी आता लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारने जनविकासाची अनेक कामे केलेली आहेत. लोकसभा निवडणुकी नंतर आघाडीमध्ये राहिलेले उरलेसुरले पण उद्धव ठाकरेंना सोडून जातील असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाषणात लगावला.
राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील सर्व घटक पक्षांचा आज रविवारी जिल्हास्तरीय मेळाव्याचे राज्यभर आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये महायुती मधील शिवसेना एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, प्रहार जनशक्ती पक्ष आदी घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर शहरातमध्ये आयोजित महायुती जिल्हा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला ऊर्जा लाभलेले नेतृत्व आहे. आज युवाशक्तीसाठी त्यांनी विशेष कार्यक्रम घोषित केलेला आहे. शेतकरी, उद्योग, कामगार, युवा आदीसाठी अनेक योजना देत जनतेला सहाय्य करण्याची भूमिका सरकारची आहे. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर ठळकपणे नेणे गरजेचे आहे. सरकारची सकारात्मक बाजू जनतेसमोर नेणे हे महायुती कार्यकर्त्यांसमोर आव्हान असून त्याद्वारे जनतेशी संपर्क वाढवणे गरजेचे असल्याचे राधाकृष्ण विखे म्हणाले.