Ahmednagar Politics : तीन पक्षाच्या सरकारमध्ये आपल्याच आमदारांना निधी दिला जात असल्याने जाणीवपूर्वक विरोधी आमदार यांनी सुचविलेल्या कामांना निधी न देता कात्रजचा घाट शासनाकडून दाखवला गेला आहे. अपक्ष असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे आ. शंकरराव गडाख यांनी सुचविलेल्या रस्त्याच्या व विजेच्या कामाला निधी मिळाला नाही.
पुरवणी बजेट मध्ये श्रीगोंदा ३९.३९ कोटी, पारनेर ४१.५०, शेवगाव- पाथर्डी ४१.८८, कोपरगाव २५, अकोले १२२.७३, राहता २१. ७३, संगमनेर ७.९१,नगर तालुका ९, कर्जत जामखेड १५.७५ एवढा निधी मिळाला असताना नेवासा तालुक्यासाठी काहीच तरतूद या पुरवणी बजेट मध्ये नाही. इतर तालुक्यात पुरवणी बजेटमध्ये निधी आलेला असताना नेवासा तालुक्याला का टाळले ? असा सवाल तालुक्यातील जनता विचारत आहे.
वर्षभरात अनेक राजकीय हालचाली झाल्या. परंतु आ. गडाख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठामपणे उभे राहिले. गेल्या वर्षी आ. गडाख यांनी सुमारे ११० कोटींच्या रस्त्याला पाठपुरावा करुन मंजुरी आणली. सदर कामांची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली होती. तालुक्यात वीज कामानांही निधी मिळवला होता.
या सर्व कामाला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. कामांना स्थगिती आणून गडाख यांची मोठी राजकीय अडचण करण्यात तालुक्यातील विरोधकांनी यश मिळवले आहेत. यामुळे गडाख पुरते अडचणीत सापडले आहे. गडाख यांचे मंत्रिपद गेल्यावर स्थानिक विरोधक पुन्हा आक्रमक झाले.
लवकरच गडाख यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक ?
मुळा शैक्षणिक संस्था, नेवासा तालुका दूध संघ, मुळा कारखाना, मार्केट कमिटी यासह त्यांच्या ताब्यातील संस्थेच्या चौकशा सुरू झाल्या असून अंथरुणावर खिळलेले व सक्रिय राजकारणापासून दूर असलेले आजारी बंधू प्रशांत गडाख यांचेसह दूध संघाच्या संचालकावर गुन्हा दाखल झाला,
तसेच स्व. गौरी गडाख प्रकरणात आ. गडाख यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी कारवाई जलद प्रकारे चालू झाली असून लवकरच गडाख यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होईल, अशी चर्चा आ. गडाख विरोधी गटात जोर धरत आहे. या चक्रव्यूहातून आमदार गडाख बाहेर कसे पडतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.