राजकारण

पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहिल्यानगर दि.१३- पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

पारनेर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार गायत्री सैंदणे, गट विकास अधिकारी दयानंद पवार उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने कोणाच्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार व निर्भीडपणे काम करावे. नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याबरोबरच कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.

तालुक्यातील प्रत्येक घरासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने वीज मिळाली पाहिजे. तालुक्यातील विद्युत रोहित्रांची, सिंगल फेजची कामे विहित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता सौर ऊर्जेला शासनाचे प्राधान्य असून मागेल त्याला मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरकृषी पंपाचे वितरण करण्यात यावे. विजेच्या बाबतीमध्ये एकाही नागरिकाची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना १०० दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यासह आपल्या जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होताना निश्चितच आपणास दिसेल, असा विश्वास व्यक्त करत पारनेर तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते यावेळी म्हणाले.

आमदार काशिनाथ दाते म्हणाले, जलजीवन मिशन, संजय गांधी निराधार योजना, विद्यूत रोहित्रे, शिधापत्रिका याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

बैठकीस तालुकास्तरावरील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पिंपळगाव जोगा कालव्याची जलसंपदामंत्र्यांनी केली पाहणीपारनेर शहरापासून जवळ असलेल्या पिंपळगाव जोगा कालव्याची जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24