Ahmednagar Politics : कांदा निर्यातबंदी उठवल्याचा श्रेयवाद भाजपामध्ये उफाळला आहे. परंतु ही सर्व बनवाबनवी आहे, भाजपच्या धोरणात्मक बनवाबनवीचाच हा एक भाग आहे.
मुळात ही बंदी लागू कशासाठी केली होती? ज्यावेळेस भाववाढ झाली, त्याचवेळी निर्यातबंदी लागू केल्याने भाव कोसळले.
आता नवे पीक येताना निर्यातबंदी उठवली जात आहे, शेतकऱ्याच्या कांद्याला परत कवडीमोल भाव प्राप्त होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केला.
नगरमध्ये माजी मंत्री आ. थोरात यांच्या उपस्थितीत पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा काँग्रेसने केलं होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. थोरात म्हणाले, महानंदा ही दूध उत्पादकांची संस्था आहे, तिची मोठी जमीन व किंमती अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे.
त्यामुळे ही संस्था गुजरातच्या घशात घालताना ती कोणत्या पद्धतीने घातली, याचा करार राज्य सरकारने जाहीर करावा, दूध उत्पादकांना या कराराची माहिती द्या, अशी मागणी आ. थोरात यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीची बैठक २७ फेब्रुवारीला मुंबईत होत आहे. शिर्डीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मुंबईतील काही जागांसाठी आम्ही व शिवसेना असे दोघेही आग्रही आहोत,
अशा पाच-सात जागांचा निर्णय बाकी आहे, चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, असे आ. थोरात यांनी यावेळी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी अद्याप मविआमध्ये सहभागी झालेली नाही.
आंबेडकर यांच्या टीकेचा रोख काँग्रेसकडे आहे, याकडे लक्ष वेधले असता आ. थोरात म्हणाले, देश गंभीर वळणावर आहे.
लोकशाही व संविधानाची काळजी वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आंबेडकरांचा पक्ष आमच्या बरोबरच राहिल असा विश्वास वाटतो.
महसूलावरून विखे पाटील यांना टोला
राज्य सरकारचे नवे वाळू धोरण फसले, त्यामुळे मोठा महसूल बुडाला, असा आरोप आ. थोरात यांनी केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री विखे यांनी वाळूतून जिल्ह्याला ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल कधी मिळाला नाही, त्यामुळे सरकारचा की थोरात यांचा महसूल बुडाला? असा सवाल केला होता.
त्याला प्रत्युत्तर देताना आ. थोरात म्हणाले विखे यांनी आपल्या खात्याचा बारकाव्याने अभ्यास करावा. गौण खनिजचा महसूल २ हजार २०० कोटी रुपयांहून अधिक होता. त्यांनी वैयक्तिक माझ्यावर घसरण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु माझे एक भाषण त्यांच्या जिव्हारी लागलेले दिसते, असा टोला लगावला.