राजकारण

Maharashtra Politics : सरकार काकांचे पण पुतण्याला विरोध ! भर पावसांत करावं लागलं आंदोलन

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील मंजूर झालेली एमआयडीसी सरकारने रोखल्याच्या निषेधार्थ विधानभवनाबाहेर भर पावसात निदर्शन केले.

रोहित पवार यांनी सकाळपासूनच विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात फलक घेत भर पावसात वैयक्तिक निदर्शन सुरू केले. कर्जत-जामखेडसाठी मंजूर झालेली एमआयडीसी सरकारने अडवून ठेवल्याबद्दल महायुती सरकारचा ते निषेध करत होते.

या निदर्शनाची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पवार यांची भेट घेतली व तत्काळ बैठक बोलावून अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतोय.

शब्द पाळला नाहीत तर आमरण उपोषण करेन, असा इशारा रोहित पवार यांनी सामंत यांना दिला. रोहित पवार यांनी ज्या सरकारविरोधात आंदोलन केले, त्या महायुती सरकारमध्ये त्यांचेच काका अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत.

त्यामुळे रोहित पवार यांनी आपल्या काकांच्याच सरकारविरोधात भर पावसात केलेल्या आंदोलनामुळे विधानभवनात सोमवारी तो चर्चेचा विषय होता.

Ahmednagarlive24 Office