Maharashtra News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली ती कशासाठी? त्यांचे दोन मंत्री आजही अटकेत आहेत. हुकूमशाही याचा दुसरा अर्थ काय ? त्याविरोधात आम्ही संघर्ष करणार आहोत, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांची पाठराखण केली.
ते सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालू आहे का, या प्रश्नावर पवार म्हणाले, केजरीवाल यांचा गुन्हा काय होता ? त्यांनी राज्यात मद्यसंदर्भात धोरण ठरवले आहे.
प्रत्येक राज्यात असे धोरण केलेले असते. शाळा, कॉलेजपासून किती अंतर ठेवावे, याबाबत सर्व गोष्टींची आखणी त्या धोरणात असते. ते तयार केले म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायची, त्यांचे दोन मंत्री आजही अटकेत आहेत. हुकूमशाही याचा दुसरा अर्थ काय ?
राज्यातील काही भागांत दुष्काळी स्थिती आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातही दुष्काळ आहे. यापूर्वी राज्यात, देशात अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही सरकारची सगळी शक्ती कामाला लावली. मी केंद्रात असताना अशा स्थितीत देशाचा दौरा करून जे काही करता येईल ते केले. आज त्याची गरज आहे. राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. अशी स्थिती राहिल्यास संघर्षांची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप, पटेलांवर खोचक टीका
प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लीन चिट दिली आहे, यावर पवार म्हणाले, सीबीआय त्यांना आता क्लीन चिट देणारच. प्रफुल्ल पटेल हे आमच्या समवेत होते, तेव्हा आम्ही चिंतेत होतो. सध्या नवीनच वारे सुटले आहे. ‘जेल जाण्याऐवजी भाजपमध्ये गेलेले बरे…’ असा त्याचा अर्थ आहे.